Powered By Blogger

Monday, May 29, 2017

याद पिया की आए...

मी लिहिलेली कथा खाली पोस्ट करतोय...
तो...
तो, एक स्वछंदी, मनस्वी तरुण...
कोकणात वाढलेला, आता मुंबईत राहत असला तरी मनात कोकणीपणा जपून ठेवलेला... वाडीतल्या प्रत्येक झाडावर प्रेम होतं त्याचं. तासंतास खेळू शकायचा तो एकटाच वाडीत.
असेल पाचेक वर्षांचा, तेव्हाच त्याच्यावरचं पितृछत्र हरवलं... भर पावसात नारळ उतरवायला माडावर चढलेले वडील, खाली उतरले ते कोळसा होऊनच...
तेव्हापासून आईने त्याला वाडीत पाठवणं बंद केलंन... नुसतं मळभ आलं तरी आईचा जीव घाबरत असे... पावसात तर वाडीत पाय ठेवू द्यायची नाही त्याला...
शाळेतले मित्र आणि शेजारी ग्रामोफोनवर ऐकल्या जाणाऱ्या गझल, ठुमऱ्या हाच काय तो विरंगुळा होता त्याच्या जीवाला
खूप मेहनत करून तो दहावी झाला आणि गावच्या सरपंचाने त्याला पुढे शिकायला मुंबईला पाठवलं.
अंगभूत हुशारी, तुफान मेहनत यांच्या जोरावर त्याने एका फार्मा कंपनीत चांगली नोकरी मिळवली आणि मार्गाला लागला.
गावाकडे आई एकटीच होती, थकली होती आता ती जरा... जशी होईल तशी याच्या लग्नाची जुळवाजुळव करत होती...
आता सून आण आणि मला आराम करू दे म्हणून आई मागे लागली होती त्याच्या.
पण हा मात्र काहीही दाद देत नव्हता.
लग्नाचा विषय काढला की तो कोशात जाई, सकाळ दुपार संध्याकाळ आईशी बोलत असणारा तो मग तीन तीन दिवस तिच्याशी बोलत नसे. नक्की काय झालंय तेच काही काळत नव्हतं कोणाला.
नोकरी उत्तम चालू होती, पगार चांगला होता, काहीही व्यसनं नव्हती, तो एकटाच संध्याकाळी त्याची आवडती कडक कॉफी पीत बसे.
ठुमरी, गझल्सचा त्याला खूप शौक होता. त्यातला दर्द त्याला फार अपील होत असे. लहानपणापासून वडिलांशिवाय वाढल्यामुळे म्हणा किंवा लहान वयात परिस्थितीशी खूप झगडावं लागल्यामुळे म्हणा, तो त्याच्या वयाच्या मानाने खूप जास्त मॅच्युअर होता.
जेमतेम तिशीत असताना मुंबईसारख्या ठिकाणी एकट्याने भाड्याने घर घेऊन राहणं म्हणजे काही सोपं नव्हतं, पण तो सगळं छान मॅनेज करत होता. कंपनीत दोन वर्षं पूर्ण झाल्यावर त्याने स्वतःची एक छानशी कार घेतली होती. सकाळ संध्याकाळ gym करून छान तब्बेत कमवली होती. मुली मागे असत त्याच्या, पण तो अजिबात लक्ष देत नसे. अगदी परफेक्ट एलिजिबल बॅचलर होता तो.
त्या दिवशीही तो संध्याकाळी ऑफिसनंतर जिम करून घरी आला. अनोखळी नंबरवरून चार फोन येऊन गेले होते.
त्याने call back केला. true caller ने त्याच्याच ऑफिसात महिन्याभरापूर्वीच जॉईन झालेल्या मुलीचं नाव दाखवलं. हा आनंदला जरा.
बोलणं सुरु झालं, आपण दोघे एकमेकांसाठी परफेक्ट असू शकतो हे लक्षात आलं दोघांच्या. कमिटमेंट दोघांनी दिली. तीही अगदी त्याला साजेशीच होती. सावळी, उंच, तब्बेत छान राखून असलेली, डस्की ब्यूटी म्हणतात तशी...
दोघांनीही पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला होता. जवळपास सात महिने एकमेकांना नीट ओळखून - पारखून घेतल्यानंतर लग्नाचा विचार त्यांनी पक्का केला.
पुढच्या महिन्यात आईचा वाढदिवस आहे, तेव्हा दोघेही गावी जाऊ आणि आईला कारही दाखवू आणि ही आनंदाची बातमीही सांगू असं त्यांनी ठरवलं होतं.
'आज संध्याकाळी भेटू आणि आईला साडी आणायला जाऊ' असा मेसेज त्याच्या मोबाईलवर झळकला, खूष झाला तो.
पटापट ऑफिसातली कामं उरकली त्याने. आज जिमला दांडी मारू असा विचार करून त्याने कार काढली आणि त्यांच्या भेटायच्या ठिकाणी जायला निघाला.
सवयीप्रमाणे आईला फोन झाला, ख्यालीखुशाली विचारून - सांगून झाली, आणि त्याने तिचा नंबर डायल केला.
नॉट रीचेबल, नॉट रीचेबल, नॉट रीचेबल....
बॅटरी संपली असेल असा विचार करून तो पुढे निघाला.
त्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त ट्राफिक होतं रस्त्याला, याला पोचायला उशीर होणार होता. ती वाट बघत उभी असेल असा विचार मनात येताच तो जरा वरमला.
FM चालू केलं त्याने, RJ त्याच भागातले ट्राफिक अपडेट देत होता.
काहीतरी अपघात झाला असल्यामुळे तिथे पोलिसांनी ट्राफिक थांबवून ठेवलं होतं.
तितक्यात पलीकडच्या बाजूने एक ऍम्ब्युलन्स रोंरावत निघून गेली.
याला काहीतरी अशुभ असल्याची जाणीव झाली. परत तिचा नंबर डायल केला, आता लागला, एका पोलिसाने उचलला, नुकताच ऑन केला होता त्याने.
'साहेब, दोन गल्ल्या सोडून हॉस्पिटल आहे, तिथे या, शुद्धीत आहेत, पण क्रिटिकल आहेत... रस्ता ओलांडताना एका जीपने धडक दिली' पोलिसाने एका दमात सांगून टाकलं...
हा नखशिखांत हादरला... गाडी तिथेच तशीच सोडून धावत हॉस्पिटल गाठलंन त्याने...
उपचारांसाठी घेऊन जाताना, त्या चाकांच्या गादीवर झोपलेल्या तिचा चेहरा दिसला त्याला, डॉक्टरला बाजूला ढकलून तो कोसळलाच...
'थांबले होते मी, तुझ्यासाठीच... येते... पैठणी घे आईसाठी...' असलं काहीतरी अस्पष्ट अस्फुट पुट्पुटलं तिने, पुढचं काही ऐकू शकला नाही तो, आणि बघूही शकला नाही.
डॉक्टरांनी तीन महिने प्रयत्नांची शर्थ करून तिला या जीवावरच्या अपघातातून वाचवलं. पण ती उभी राहू शकलीच नाही कधी. स्मृती साफ गेली होती. तिच्या आईवडील आणि भावाशिवाय बाकी कोणालाही ओळखूच शकत नव्हती ती... एक दिवस त्याच्या पत्त्यावर एक साधं पत्र आलं, तिचे आईवडील तिला घेऊन मुंबई सोडून गेले, कोणताही पत्ता न कळवता.
याने बराच शोध घेतला, पण व्यर्थ...
आयुष्य पुढे जातच होतं... हा बऱ्यापैकी सावरला होता. कामात फार बुडवून घेतलंन याने स्वतःला...
दिवसभर काम करायचं, संध्याकाळी कॉफी पीत ठुमरी ऐकत बसायचं हेच आयुष्य झालं त्याचं...
आजही तो तसाच बसला होता, आज तिचा वाढदिवस... जुन्या आठवणी दाटून येत होत्या, याच्या अश्रुनीराला खळ नव्हती...
तिने गिफ्ट केलेला कॉफीचा मग काढला त्याने, भरून घेतला काठोकाठ, बोस च्या दमदार साउंड सिस्टीमवर ठुमरी चालू होती, त्याची सगळ्यात आवडती गायिका - कौशिकी - पिळवटून गात होती...
बाली उमरिया, सुन री सजनिया, जौबन बीता जाए रे, हाय राम,
याद पिया की आए...
---
बोका

No comments:

Post a Comment