आमचे समस्त गुरु सदैव आमचे लघू कान गुरु करण्यात धन्यता मानत असत... असो... असतं एकेकाचं नशीब... फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी अचानक त्यांच्या हातात चोकलेट वगैरे दिसत असे, 'दात किडतील, मुलांनी चोकलेट खाऊ नये' असं म्हणत आमच्या समोर भर वर्गात दहा चोकलेट खाणारे नेने मास्तर अजून डोळ्यासमोर आहेत. त्यानंतर "तुमचे दात नाही का किडणार" या काळजीपोटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर फक्त मी 'एकारान्त' असल्यामुळे एका चापटीच्या रुपात मिळालं होतं, अन्यथा त्यांना 'याक्कोझूना' हे सार्थ नाव होतं. एक आपटे मास्तर होते त्यांनी मला कधीच फुटबॉल का खेळू दिला नाही ते आजतागायत कळलेलं नाही. गणिताच्या माझ्या मास्तरांचा अर्धा वेळ माझी झोपमोड करण्यात जात असे. आमच्या 'संशोधनाचा' धसका घेऊन सायन्सच्या मास्तरांनी आमची ल्याब मधली एन्ट्रीच बंद करून टाकली होती.
पण काहीही असलं, तरी अजूनही रस्त्यात भेटले, की प्रेमानी विचारपूस करतात, हक्कानी पोटावर गुद्दा मारून, 'जरा आत घे' असं सांगतात, इतर मुलांची चौकशी करतात, कधीमधी 'शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यायला' म्हणून शाळेत बोलावून भाषण वगैरे करायला लावतात. ( नीट बोलायचं हां, नाहीतर लिहून देतो, असंही सांगतात). नमस्कार करायला खाली वाकलो तर पाठीवर जोरदार गुद्दा मारून "कितीही मोठे घोडे झालात तरी आमच्यासमोर वाकायचं विसरत नाहीत, तोवर तुम्हाला यश मिळत राहील" असा आशीर्वाद देतात. रोजच्या दुनियादारीच्या मारामारीत आमची कातडी जाड झालेली त्यांनाही कळत असते, तरीही गालगुच्चे घेऊन आम्हाला लहान मुलासारखं वागवतात. मास्तर लोक हे शेवटी मास्तर असतात...
द्वाड विद्यार्थी बोका,
ओंकार आठवले.
( संमिश्र भावना असल्यामुळे लिखाण विस्कळीत वाटू शकते.)


No comments:
Post a Comment