दोन दिवस सुट्टी होती. सक्काळी सक्काळी ग्यांग ला घेऊन क्रिकेट खेळून झालं. तेजोनिधी माथ्यावर आला, आणि मी मस्त जेवण उरकून ताक पीत बसलो होतो. "काय रे नुसते उन्हातान्हाचे उंडारत फिरता गावभर ?? जरा कैऱ्या बघा चांगल्या. नंतर कैरीची डाळ आणि पन्हं मागाल तर दणके देईन." स्वयंपाकघरातून आजीचा आवाज आला, आणि डोळ्यावर आलेली पेंग खाड्कन उतरली. कैऱ्या !!! आनंदाचा ठेवा माझ्या !!! मग काय विचारतो हो !! डोळ्यासमोर नक्की कुणाकुणाच्या बागेत मला हव्या असलेल्या कैऱ्या 'सेफली' मिळू शकतील याचा अंदाज घेणं सुरु झालं. मित्रांना फोन गेले आणि सर्वानुमते आमच्या घराजवळ असलेली गोडबोल्यांची बाग या धाडीसाठी मुक्रर केली गेली. ( गोडबोल्यांची बाग आमच्या घराजवळ आहे, हा आमचा दोष नव्हे.) दुपारी अशीही सामसूम असते. कुंपणावरून उडी मारून आत गेलो आणि गोडबोल्यांच्या आडदांड कुत्र्यानी आमच्या स्वागतासाठी मुजरा घातला. हा कुत्रा आमच्या गणू भावेच्या ओळखीचा असल्यामुळे, दोन कैऱ्या एक्स्ट्रा देण्याच्या बोलीवर, आमचा कार्यभाग साधेपर्यंत भाव्यानी त्याला सांभाळला. झाडावर चढून जवळपास चाळीस एक कैऱ्या पाडून झाल्या होत्या. काही कैऱ्या 'कशा लागतात बघू दे' असं म्हणत चव-परिक्षेसाठी खर्ची पडल्या होत्या. ऑफिसला न्यायच्या ब्यागेत भरून कैऱ्या सुखरूप सीमेपार पोचल्या, आणि कुत्र्यानी त्याच्या इमानदारीची जाणीव करून दिली. कैऱ्या घेऊन आम्हाला पळून जाताना बघून गोडबोल्यांनी त्यांचं आडनाव सार्थ करणाऱ्या अस्सल शिव्या द्यायला सुरुवात केली. अठ्ठावीस वर्षांचे घोडे झालो तरीही अजून कलमाच्या कैऱ्या पळवण्यातला आनंद आम्ही सगळे मनसोक्त उपभोगतो. घरी आणून आई आणि आजीच्या समोर हा लुटीचा खजिना रिता केला. 'कोणाच्या??" ला "गोडबोल्यांच्या" असं उत्तर मिळाल्यावर "तुम्ही वांदरं सुधारणारी नव्हे" असा शेरा मिळाला, पण आम्हाला त्याची पर्वा नाही हे गोडबोलेसुद्धा जाणून आहेत. मग मात्र आजीनी भराभर हात चालवून गूळ, केशर-वेलची घालून पन्हं केलं. आता मात्र त्या पन्ह्याच्या बाटल्या कुठे लपवून ठेवाव्या या विवंचनेत आजी आहे.
कलमांचा राखणदार,
हापूस बोका.
(ओंकार आठवले)


No comments:
Post a Comment