Powered By Blogger

Monday, May 29, 2017

खरी सकाळ

आजच्या दिवसापर्यंत मी कधीही गजर लावून उठलो नाही. किंबहुना, गजर हा माझ्यासाठी होतच नाही, अशी माझी समजूत आहे. शांत, स्वस्थ, सुखाची झोप सोडून त्या गजराच्या किर्रर्र्र्र आवाजानी जागं होणं ही काय दिवसाची सुरुवात आहे ?? एक तर मी रात्री कितीही उशिरा घरी आलो तरी चार पाच नाट्य गीतांचा नैवेद्य दाखवल्याशिवाय निद्रादेवी माझ्यावर प्रसन्न होतच नाही, आणि तिनी दिलेलं झोपेचं वरदान अर्धवट सोडून देणं माझ्या जीवावर येतं. माझ्या दिवसाची सुरुवात कशी होते बघा हं,
सकाळचे ५:३०
आई : "अरे, उठ आता, ऑफिस ला नाही जायचं का ??"
मी : "सोड गं, मस्त कॉफी कर, आज लोळत राहावंसं वाटतंय"
आई : "बरं, झोप झोप"
.
.
.
.
सकाळचे ५:३५
आई : "उठ रे आता"
मी : "उम्म्म… हो, उठतो… कॉफी केलीस का??"
आई : "लाथ घालते कंबरेत आता, कॉफी केलीस का म्हणे, चल ऊठ चटकन, मला कॉफी करून दे तूच आज, आणि हो, चटचट आवर, मला पण जायचंय ऑफिसला"
या गर्जनेनंतर काय बिशाद आहे माझी झोपून राहायची…
दिवसाची सुरुवात कशी व्हावी याबद्दल माझं एक लहानसं स्वप्न आहे… मंजुळ आवाजात हाक यावी, "अरे उठतोयस ना ??" मी काहीच उत्तर देऊ नये. तो मंजुळ आवाज हातात वाफाळत्या कॉफीचा कप घेऊन मी खरंच झोपलोय का हे बघायला यावा. आणि मला ढोसल्यासारखं करावं. त्या कॉफीचा अरोमा खोलीभर पसरावा, त्या धुंदीत मी उठावं, पटकन ब्रश करावं, तोवर होम थिएटर वर भीमसेनजींनी Morning Raagas आळवायला सुरुवात करावी, मी आणि त्या मंजुळ आवाजानी समोरासमोर बसून त्या डिव्हाईन स्वरांचा आनंद घेत घेत कॉफी संपवावी. फटाफट अंघोळ, अथर्वशीर्ष वगैरे आटपून यावं. आवडीचा नाश्ता मी करावा आणि खाऊन, पोझीतीव्ह एनर्जीने भरून ऑफिसला जावं.

अर्थात हे माझं स्वप्न आहे, पूर्ण झालं तर छानच… नाही तर आहेच त्या गजराच्या किर्र्र्र्र्र्र नी दिवसाची सुरुवात !!!

झोपाळू बोका,
ओंकार आठवले

No comments:

Post a Comment