अण्णा
.
.
.
तो XX चा मला शिकवणार काय लाय्टीचे कनेशन कसे लावायचे ?? अरे पच्चीस वरस घालवले या लाइन मदे. त्याला सांग तुझ्या डिग्र्या नेउन घाल XXत. चार तास शो वर हुबा रायला सांगितला तर यांच्या XXत XX येते… बिस्लेरीचा पानी पायजेल, शिग्रेटी पायजेल. फुक्कटची शायनीन मारायला पायजेल साल्यांना… एका सेट अप वर आलेला आमचा लाईट टेक्नीशिअन अण्णा त्याचा राग माझ्याजवळ काढत होता. उभी हयात लाईटच्या जोडण्या करण्यात घालवलेला हा माणूस. याचं खरं नाव त्याला स्वतःला सुद्धा ठाऊक नसेल. पण त्याला सगळे अण्णा म्हणतात. धारावीच्या एका चाळीत एकटाच राहतो. पण ही वल्ली सदैव आमच्या लाईटवाल्याच्या गोडाऊन मध्येच असलेली पाहिली आहे मी. कधीही कोणताही शो असला तरी "लाईट पे कौन है" ला "अण्णा है ना" असं उत्तर आलं की आम्ही निर्धास्त असतो. आपण कुणासमोर आहोत, कुठे आहोत याची जराही तमा न बाळगता त्याचं यथेच्छ बिडीपान सुरु असत. आणि का कुणास ठाऊक एका वाक्यात किमान दोन तरी शिव्या असतातच. पण माणूस मोठा प्रेमळ. मध्यंतरी माझ्या अंगावर एक बराच मोठा इव्हेंट होता. खूप को ओर्डीनेशन होतं. सलग दोन दिवस आणि तीन रात्री सेट अप उभा करणे आणि इव्हेंट रन करणे यात माझ्या झोपेची आणि खाण्यापिण्याची पार वाट लागली होती. साहजिकच एक सेशन संपून दुसरं सुरु होण्याच्या मधल्या पंधरा मिनिटांच्या ब्रेक मध्ये ब्याकस्टेज जाऊन बसलो आणि अंमळ डोळा लागला होता. अचानक कुणी तरी धक्का देऊन मला जागं केलं. पाहिलं तर अण्णा होता. हातात एक कॉफ्फीचा कप. "ले साब, कॉफी पी. थोडा अच्चा लगेगा तेरेको. मै देख रहेला है तू सो रहा नही, खानेको टैम नही. साला आदमी है की क्या है… कैसा काम कर सकता है रे ?" मी खरं तर खूप थकलो होतो पण आपलं उगाच "काम है अपना अण्णा, करना पडता है", वगैरे सांगून उगाच काही नाहीसं दाखवलं. पण अण्णा आता ऐकणारा नव्हता. "तेरा बॉस को बोल XXका छुट्टी दे. थोडा आराम करने को पडता है." त्या नंतर अण्णा त्याच्या आणि मी माझ्या कामात गढलो. इव्हेंट सक्सेसफुल झाला. आफ्टर पार्टी मध्ये मी एका बाजूला आमच्या सगळ्या व्हेंडर्स बरोबर बिलिंग सोर्ट करत बसलो होतो. आणि अण्णा मधेच येउन म्हणाला "साब, थोडा बात करने का है". मी त्याला बाजूला नेलं. त्याच्या डोळ्यात हलकसं पाणी दिसत होतं. मला कळेना नक्की काय होतंय . "साब एक बात सांगतो तुला. साला सगळी दुनिया आपल्याला XXसमजते. पन आपला हात तुला मालूम आहे. काल तू बोल्ला म्हणून मी गप रायला. नायतर त्या XX ला तितेच दिला असता XX. मला पन तुज्याएवडा पोरगा हाय. गावाकडे असते. तुला पायला की याद येते. सायबा, खाना पिना सांबाल. मोट्टा होणार तू." काहीही कारण नसताना अचानकपणे हा अण्णा मला आशीर्वाद देऊन गेला. आणि कुणालाही न दुखावता आपलं काम साधून घ्यायच्या माझ्या सवयीचं माझं मलाच कौतुक वाटलं…
.
.
.
.
.
माणसं जोडून असलेला बोका,
ओंकार आठवले.
Monday, May 29, 2017
अण्णा लाईटवाला
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment