"अरे भटा, चल जरा जाऊन येऊ", आप्पा म्हात्रेचा फोन आला. मी "काय, कशाला, कुठे" असे प्रश्न विचारत बसत नाही. या आप्पाला 'ब्राह्मण' हा शब्द नीट म्हणता येत नाही, आणि आमच्यापैकी कुणालाही नावानी हाक मारणं त्याच्या तत्वात बसत नाही. "आप्पाबरोबर जाऊन येतो गं" असं आईला ओरडून सांगायचं आणि चालू पडायचं. हा आप्पा माझ्या वर्गातला. माझ्याहून तब्बल पाच वर्षं मोठा. तसा तो अनेकांच्या वर्गात होता. पण बाकीची अनेक पोरं त्याला मागेच ठेवून पुढे निघून गेली. आमच्या अक्ख्या वर्गानी त्याला मदत करून दहावी पास चा शिक्का मारून दिला होता, तेव्हापासून तो आमच्या सगळ्या वर्गाचा यार झाला होता. आमच्याच गावात राहणारा, नेहमी कशा ना कशासाठी घरी येणं जाणं असायचं, त्यामुळे घरच्यांना माहीत होता. अशोक बुधाजी म्हात्रे, उर्फ आप्पा. शिक्षण - दहावी पास. त्याच्या अक्ख्या कुळात कॉलेजची पायरी चढलेला वीर हा पहिलाच. अत्यंत वांड, पिढीजात धंदा म्हणजे वीटभट्टी आणि दुधाची लाईन. कॉलेजमध्ये आमच्याबरोबर येणं जाणं. इंग्रजीचा आणि त्याचा अजिब्बात संबंध नसल्यामुळे सदैव आम्हाला चिकटून राहणारा. "तुम्ही भट लोकं माझ्याबरोबर असता म्हणून मला चार चांगल्या गोष्टी कळतात, वट वाढते आपली" असा सदैव जप करणारा. वास्तविक आम्ही त्याच्या दांडगटपणाचा धसका घेऊन असू. बारावीनंतर मी हॉस्टेल वर राहायला लागलो आणि शाळेतल्या मुलांशी संपर्क तसा कमीच झाला होता. बाकी कुणीही नाही तरी हा आप्पा मात्र नेहमी फोन करायचा. बारीक सारीक गोष्टीत सल्ले घ्यायचा. त्यानी बारावीची परिक्षा दिलीच नाही. "काय शिकीवतो त्यो मास्तर कळंना मला, त्ये येवढे कागद कोण भरून कहाडील, हाताला रग लागते, मरुदे तिच्यायला" असं म्हणून त्यानी कॉलेजला रामराम ठोकला आणि धंदा सांभाळायला घेतला. लगेच लग्नही केलं. मुलगा झाला. त्याची प्रत्येक गाडी शोरूम मधून घरापर्यंत आणायला त्याला मीच हवा असतो. "मला वेळ नाही रे" असं म्हणावं तर "तुला कधी वेळ आहे ते सांग, आपण तेव्हा जाऊ" असा आग्रह. असाच एक दिवस आप्पानी बोलावलं मला घरी. मी गेलो. "भटा, ऑफिस खोल्तोय सोत्ताचं, दोन खोल्या आहेत. एकीमदे कंट्रश्शन बगनार आनी दुसरीमदे दुदाचं सगलं. ए सी बिसी लावनार, दोन पोरं बसवनार, टकाटक पायजे एकदम." "वा वा !!! छान " - मी. "पण मग मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे??" "म्हननं म्हंजी काय भाड्या, ती दोरी बान्तात ना दाराला, ती कापायला यायचं" "मी??" "हो तूच. साला तुमच्या भट लोकांकडे बघून तर मी इमानदारीत धंदा करतोय, माझा पोरगा रोज सकाली देवाला नमस्कार करून शाळेत जातो ते तुझ्या आईनी शिकवलं म्हणतो. आपला आयुष्य फुकट जाता जाता वाचवला तुम्ही भट लोकांनी, म्हणून मग तुला आपला भाव मानला रे, आनी तू विचारतो मी काय करू म्हणून??" "बरं ठीक आहे, येईन मी." असं म्हणून मी त्याच्या घरून निघालो खरा, पण मला नक्की कळेना की आम्ही मुलांनी नक्की काय मदत केली याला ? मी एकतर लहानही होतो त्याच्यापेक्षा. पण फार मानानी वागवायचा आम्हाला. खरं तर आम्ही जे वागत होतो ते त्याला पटत, रुचत होतं म्हणून तोही तसं वागायचा प्रयत्न करत होता. त्याच्या इमानदारीत आमचं योगदान खरं तर काहीही नव्हतं. कदाचित त्याला तसं वाटत असावं. असो, मी जाऊन त्याच्या नवीन ऑफिसचं उद्घाटन करून आलो. लहानसं पण छान स्वच्छ ऑफिस आहे. आप्पाच्या केबिन मधल्या टेबलवर एक फ्रेम आहे. आमच्या शाळेतल्या ग्रुपचा फोटो आहे. "बघ भटा, सगळे तुम्ही भट लोक आणि मी एकटाच, जास्त जळलेल्या विटेसारखा, जरासा वेगळा. बाकी कायपण बोल तू, सगळा चांगला गुण लागला तुमचा !!!"
असो, आप्पाची नवीन फार्च्युनर येतेय पंधरा ओगस्ट ला. व्हाईटम व्हाईट एकदम. मलाच जायचंय आणायला.
भट बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment