नाती.…
त्याचं काय आहे, माझ्या कामाचं स्वरूपच असं आहे की मला देशभरातल्या व्यक्तींशी संपर्क ठेवावा लागतो. सर्व धर्म, प्रांत, भाषा यामध्ये माझ्या ओळखीचे लोक आहेत. तर झालं असं, की ईद च्या दिवशी मी माझ्या अनेक मुस्लिम व्हेंडर्सना फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यात श्रीनगर चे इक्बालभाई होते, हैदराबादचा अस्लम होता, कोलकात्याचा जावेद होता आणि असे अनेक लोक होते.
आज सोमवार, त्यामुळे जरा लवकरच आलो ऑफिसला, साधारण साडेआठ वाजता. तर रिसेप्शनला एक माणूस बसला होता, मी आत जाताच आमच्या रिसेप्शनिस्टनी म्हंट्ल 'लो, आ गये ओंकार सर'. तसा तो गृहस्थ उठला, आणि एक स्टीलचा मोठा डबा मला दिला. "क्या है इसमे ? कहां से आये हो ?" त्यावर "साबजी, इक्बालभाई है ना, उन्होने खास आपके लिये भिजवाया है" असं उत्तर मिळालं. त्याला शुक्रिया करून, कॉफी बिस्कीट द्यायला सांगून मी आत आलो, आणि इक्बालभाईला फोन लावला, आभार मानले. तो आलेला गृहस्थ म्हणजे इक्बालभाईचा भाचा. घाटकोपरला असतो. वास्तविक मी इक्बालभाईला फक्त एकदा श्रीनगर मध्ये काम दिलं होतं. साहजिकच आम्ही एकदाही भेटलेलो नाही. पण फक्त मी ईदला फोन केला म्हणून आपल्या भाच्याकरवी माझ्यासाठी त्यांनी माझ्यासाठी मोठ्ठा डबा भरून अशक्य सुंदर शीरकोर्मा पाठवला. "साबजी, हमारा और आपका एक अलग रिश्ता बन गया है अब, जम्मू में, काश्मीर में कहीं भी कोई चीज की जरूरत पडे तो बेझिजग फोन करियेगा, बंदा हाजीर है." अमरनाथ किंवा वैष्णोदेवी यात्रेला किंवा नुसतच काश्मीर फिरायला सहकुटुंब यायचं आमंत्रण मिळालंय मला. त्यांचा फोन ठेवतोय तोच ऑफिसबॉय दोन लहानसे बॉक्स घेऊन आला. अस्लम आणि जावेदनी अत्तर पाठवलंय… त्यांनाही थ्यांक्स म्हंटलय…
काय कशी नाती जोडली जातात ना आपली… वास्तविक आमचं नातं क्लायंट आणि व्हेंडरचं… पण त्याच्यापलीकडे जाऊन या नात्याचं नवं रूप खरंच सुखदायक आहे… छान वाटतंय…
नातेवाईक बोका,
ओंकार आठवले.


No comments:
Post a Comment