चला, ठासणीच्या बंदुका काढा… दारूचे बुधले, काडतुसं घ्या… डब्बल ब्यारल…एक माशी. ( हे मास्तर का म्हणत कधीच कळलं नाही ) नीट नेम धरा. झालं ?? एकाग्र ?? चला, काढा बार आता. मग ठोЅЅ असा आवाज होई. आमच्याबरोबरच आसमंतही दचकून जाई. झाडांवर सुस्तावलेले पक्षी प्राणभयाने आकाशी झेप घेत. वास्तविक ती जड बंदूक आम्हाला काही नीट पेलवत नसे. आम्ही मात्र नक्की कुठे लागली गोळी याचा अंदाज घेत, आमच्या नेमबाजी मास्तरांची करडी नजर चुकवत असू. काही म्हणा पण हे मास्तर मोठे कडक शिस्तीचे होते. आम्ही जेमतेम सातवीत होतो. आणि उन्हाळी सुट्टीत सांगलीला क्याम्प साठी हे मास्तर आम्हाला घेऊन जात असत. एक तर सुट्टी ही फक्त आराम करण्यासाठी असते ही आम्हा पोरांची समजूत, तिला हे मास्तर सरळ सरळ चूड लावीत. टळटळीत उन असे, आमची सावली आमच्याच पायाशी आश्रयाला आलेली असे, तिथे हे मास्तर आम्हाला झाडावरच्या फळावर नेम धरायला सांगत. आणि मास्तरांनी नेम धरलेलं फळ, आम्ही नेम धरलेलं फळ, आणि काढलेला बार लागणारं फळ कधीच एक नसत. मास्तर प्रचंड उखडत आणि आम्हाला त्या जड बंदुका घेऊन दहा फेऱ्या मारायला लावत. पण एकदा दैवयोगाने हे फळ एक झालं आणि मास्तरांनी माझं कौतुक केलं होतं. वास्तविक पाहता, माझ्या मित्रानी मारलेली गोळी फळाला लागली होती. पण त्यानंतर मला ती क्लुप्ती कळली आणि मी नेमबाजीचा चांगला सराव करू लागलो. बऱ्यापैकी नेम लागतो माझा अजूनही. अर्थात आता सराव फार कमी आहे.
.
.
.
.
.
आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, दुपारी मित्राचा फोन आला होता. अंबरनाथ जवळ जंगल आहे, तिथे रविवारी जाऊ म्हणाला बार काढायला… बघूया. त्याला हो म्हंटलय. नेम आजमावून बघायला हवा…
.
.
.
नेमबाज बोका ( ओंकार आठवले )
Monday, May 29, 2017
नेमबाजी
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment