पावसाचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे. पावसानी जरा जोर धरला की एखाद्या शनिवारी दुपारी जेवण उरकून, हाफ प्यांट आणि ढगळसा टी शर्ट घालून मी एकटाच घराबाहेर पडतो. एक जुन्यातली स्याक असते पाठीवर, त्यात स्टोक घेतलेला असतो. मोबाईल प्लास्टिक मध्ये गुंडाळून घेतो. माझी सगळी आवडती गाणी त्यात भरलेली असतात. माथेरानला पोचायला ओल्मोस्ट संध्याकाळ झालेली असते. अली नावाच्या माझ्या एका मित्राचं ढाबावजा हाटेल आहे. तिथे जाऊन कांदाभजी आणि चहा हाणायचा. आणि लुईसा पोइंटच्या दिशेनी चालू पडायचं. कधी अली बरोबर येतो कधी नाही. मला काही पडलेली नसते. एका वेगळ्याच विश्वात मी असतो. पोइंटला पोचल्यावर भणाणता वारा माझं स्वागत करतो. या फोटोत दिसणारी जी गोलसर पठारासारखी जागा आहे ती माझी अत्यंत आवडती आहे. मी एकवार चहूकडे नजर फिरवतो. आणि तिथल्या माती-गवतात मांडा ठोकून बसतो. स्याकमधून हेडफोन बाहेर येतात. भीमसेन किंवा झाकीरभाई किंवा कोणत्याही गझल्स सुरु केल्या जातात. मी अक्षरश: ध्यान लावून बसतो. कित्येक तास… अनेक वेळा रात्रभर तिथेच बसलेलो आहे मी… असं ध्यान लावून पाऊस अंगावर घेण्यात एक आगळीच मौज आहे. अनुभवलीय मी ती… दोन तीन वेळा… रात्रीच्या चढत्या प्रहराबरोबर चढत जाणारी बोचरी थंडी. माझ्यासारखेच काही वेडे सुद्धा असतात. रात्र भर कुणी बासरी वाजवत बसतं, कुणी गिटार… एकंदर धुंद माहोल असतो. सकाळी त्या संगीत-ध्यानातून मी बाहेर येतो. मनोवस्था खूप सुंदर असते. एका विलक्षण आनंदात मी असतो. पुन्हा अलीच्या हाटेलवर येतो. अंघोळ, नाश्ता उरकतो. एव्हाना रविवार सकाळ लक्ख उजाडलेली असते. हुल्लडबाजांचे जत्थे धडकू लागतात. रस्त्यात बाटल्यांचे तुकडे दिसू लागतात. काही विमानं दिसतात. दिवसाची सुरुवात अशा उन्मनी अवस्थेत करणाऱ्या महाभागांसाठी मी प्रार्थना करतो. आणि सगळे लोक्स 'एन्जॉय' करायला जात असताना, मी मात्र खऱ्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊन भरल्या मनानी आणि पोटानी माथेरानचा डोंगर उतरायला लागतो…
निसर्गभक्त बोका,
ओंकार आठवले.


No comments:
Post a Comment