काकांची सेल्फीची पोस्ट वाचून मनात आलेलं….
जिथे जायचं तिथे जावं, बघण्यासारखं काय असेल ते बघावं, खावं प्यावं आणि परत यावं… फार फार तर त्या प्रेक्षणीय स्थळांचे फोटो काढावेत, पण सेल्फी काढायची गरज काय प्रत्येक ठिकाणी ?? परवा एक अल्ट्रामॉड तरुण आणि 'त्याची', कमनीयपणाचा अजिबात संबंध नसलेली विशाल तरुणी ट्रेनच्या दारात उभे राहून हा सेल्फी काढत होते. तरुणाचा एक हात ह्यांडील धरण्यात आणि दुसरा त्या तरुणीला धरण्यात गुंतलेला. तरुणीने एका हातात फोन धरलेला आणि दुसऱ्या हातानी तरुणाला धरलेलं. बरं तिचा तो मोकळा केशसंभार त्याच्या डोळ्यात जातोय, आपण फास्ट ट्रेन च्या दारात उभे आहोत, आणि आपण दोन जण फक्त त्याच्या एका किरकोळशा हाताच्या ताकदीवर ट्रेनला चिकटून आहोत, या असल्या भिकार गोष्टींचा विचार करण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. ओठ शक्य तितके आक्रसून, मान शक्य तितकी वाकडी करून, गाल आणि ओठ यांचं मीलन आत्ता होईल की नंतर अशा अवस्थेत तिनी तीन चार क्लिक केले, आणि तेवढ्यात ट्रेन हिंद्कळली… दोघे जन ट्रेन मध्ये आत ढकलले गेले, पण विचार करा, ट्रेन उलट बाजूला हिंद्कळली असती तर ??? केवढ्याला पडला असता तो सेल्फी ?? या दोघांना स्टेशन येताच पायात पाय घालून पाडावं, आणि मग 'these two fell from train, feeling funny' असं शीर्षक देऊन त्यांच्याबरोबर सेल्फी काढावा असा अत्यंत खुनशी विचार माझ्या मनात डोकावला. सुहास्य वदनाने काढलेले सेल्फी पण मी म्हणतो चालतील, पण अशी माकडासारखी तोंडं करून ( माकडाचं तोंड सुद्धा चिकार छान असेल ), स्थल-काल-प्रसंगाचा जराही विचार न करता इतकं सेल्फ ओबसेसड असू नये. सेल्फी स्टिक घेऊन गर्दीच्या ठिकाणी उन्मनी अवस्थेत भटकणाऱ्या मस्तवाल रेड्यांना आणि म्हशींना त्याच स्टिक नी हाकत हाकत घरात नेउन बांधले पाहिजेत. लोक आदरानी तुमचे फोटो क्लिक करून लावतील इतकी मोठी पोझिशन कमवा, एखादा सेल्फी काढायची खरंच गरज आहे का याचा विचार करा, अन्यथा, तुमच्या याच सेल्फीला चंदनाचा हार घालायची नतद्रष्ट वेळ लोकांवर येईल.
इब्लिस बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment