आजकाल आमच्याकडे दूध डब्यात घालून ठेवतात. त्याचं काय आहे, मी कामावरून रात्रीबेरात्री घरी येतो. जेवायचा मूड असतोच असं नाही. मग फ्रीज उघडून काही इंटरेस्टिंग दिसतंय का याचा शोध सुरु होतो. मग कधी चॉकलेट, कधी काजू, कधी चीजक्यूब, कधी मिठाई, कधी लिंबाचा रस असतो बाटलीत भरून ठेवलेला, त्याचं सरबत करून पोटभर पिणं असले उद्योग मी करत असतो. म्हणजे, पोळी भाजी जेवायचं नाही, इतरच चरत राहायचं. असे मी एकदा मूठभर काजू उडवले, फरेरो रोशर चॉकलेटचा अखंड बॉक्स उडवला. बरं या गोष्टी व्हायच्या रात्री 2 2:30 ला, मंडळी साखरझोपेत, आणि पुन्हा सकाळी मी 6:30 7 ला उठून कामावर पसार, विचारणार कोणाला.. घरचे लोक चिंतेत. आणि एकदा असाच पोटात आग घेऊन मी 2 ला घरी आलो, पोळ्या आणि मेथीची भाजी होती. सहज पाण्याची बाटली काढायला फ्रीज उघडला, समोर दुधाचं भरलेलं पातेलं, त्यावरची जाड, मऊशार साय !!!! I can not resist साय... मेथीची भाजी फ्रीजमध्ये, आणि पातेलं बाहेर. त्या वेळेस मी जवळपास अर्धा लिटर गाsssssर दूध फक्त दोन पोळ्यांबरोबर संपवलं. हे सकाळी पकडलं गेलं कारण पोळ्या माझ्यासाठीच ठेवल्या होत्या, आणि त्या मी संपवल्या होत्या !!!
तेव्हापासून मी घरी उशिरा येणार हे कळलं की दूध एखाद्या स्टीलच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवतात, त्यावर इतर काही गोष्टी ठेवतात, जेणेकरून मी काही उद्योग करू नये.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण कोणत्या डब्यात दूध असतं हे मला कळलंय हे घरातल्यांना अजून माहित नाहीये !!!😉😉😉😉
मुलखाचा लब्बाड बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment