Powered By Blogger

Monday, May 29, 2017

चेन्नईहून सुटका

------: चेन्नईहून सुटका :------
                                                ( पूर्ण लेख, शांतपणे पूर्ण वाचा )

मी जवळपास अडीच वर्षांनी सुट्टी घेऊन गुहागरला गेलो होतो तेव्हाच बॉसचा फोन आला होता, 'ओंकार, तुला एक ते सहा डिसेंबर चेन्नईला जायचं आहे, तयारी कर.'  चेन्नईला मी तसा अनेक जणांशी संपर्कात असतो, जाणार पहिल्यांदाच होतो, त्यामुळे फोनाफोनी करून मी येणार हे कळवून ठेवलं होतं. मग रोजचं काम झाल्यावर कुठे कुठे फिरायचं, कुठे काय स्पेशल खायला मिळतं वगैरे प्लानिंग सुरु झालं होतं. चेन्नईला हॉटेल बुक केलं. विमानाचं तिकीट हातात पडलं आणि मी चेन्नईला कार बुक करून ठेवली. एक तारखेला सकाळी तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी व्हेंडरला फोन करून घेतला. पाऊस आहे, पण काळजी करण्यासारखं काही नाही असं सर्टीफिकेट त्यानी दिलं आणि मी निश्चिंतपणे विमानात बसलो. फ्लाईटमध्ये मी जनरली ढाराढूर झोपतो. या वेळेस जाम झोप येईना… चेन्नई जवळ यायला लागलं तसं अचानक खिडकीतून अंधार दिसायला लागला. विमान खूप हलायला लागलं, आणि चेन्नईत गडबड असल्याची कल्पना येऊ लागली. कसंबसं विमान उतरत असल्याची घोषणा पायलटनी केली आणि जीव भांड्यात पडला. पट्टे आवळून बसून होतो. रनवे दिसायला लागला, विमान खाली खाली येत असतानाच अचानक पुन्हा आकाशात झेपावलं, तो फोर्स मात्र शब्दशः हवा टाईट करणारा होता. शेवटी पुन्हा दहा मिनिटे विहंगावलोकन करून एकदाचं विमान उतरलं आणि आम्ही कुर्सी की पेटी सोडली. एरोब्रिज वरून बाहेर पडत असताना येणारा पावसाचा आवाज जरा घाबरवणारा होता. अनेकांनी मला फोन करकरून सांगितलं होतं पावसाबद्दल, पण मी सव्हीस जुलै पचवला असल्यामुळे मी तसा निश्चिंत होतो. चेक इन ब्यागेजच्या बेल्ट वर तोबा गर्दी होती. तीन तीन फ्लाईटच्या सगळ्या ब्यागा एकाच बेल्टला का टाकल्या होत्या देव जाणे. सुमारे एक तासाच्या प्रतीक्षेनंतर एकदाची सहा वाजता माझी ब्याग हाती आली आणि मी ट्याक्सीवाल्याला फोन लावला. फोन लागेचना. बाहेर तुफान पाऊस, मिट्ट अंधार… जवळपास फूटभर पाणी साचलं होतं. ट्याक्सीवाल्याला एकदाचा फोन लागला आणि त्याच्या घरात पाणी भरल्याचं कळलं. तेव्हा आता माझी मलाच सोय करावी लागणार होती. विमानतळावर तेव्हा सुमारे हजार लोक वाहनाची वाट बघत उभे असावे. प्रीपेड ट्याक्सी कौण्टर बंदच होतं. एका अण्णाला धरलं, "अण्णा, नन्दम्बक्कम, कमिंग??" "वाटर अण्णा, फूल रोड जाम अण्णा… नो कमिंग अण्णा" असं उत्तर मिळालं. तिथे कुणी 'ट्याक्सी देता का ट्याक्सी' चा नाट्यप्रयोग रंगात आला होता. मेधाताईला फोन करून मी सुखरूप उतरल्याचं कळवलं, तिनी ओला ट्याक्सी बघायला सांगितली पण तिथेही इल्लाच.

शेवटी नशिबानी एक इंडिकावाला मला हॉटेलवर सोडायला तयार झाला. तिथे एका पोलिसाला दुभाष्याचं काम करायला लावलं, आड्रेस समजावला आणि सात किलोमीटर अंतर कापायला वट्ट दोन हजार रुपये कबूल करून गाडीत बसलो.
.
.
माझ्या आधी गाडीत पाण्यानी ठाण मांडलेलं. तेव्हा ब्याग, कपडे कशाचीही चिंता न करता झक्कपैकी मांडी ठोकून बसून राहिलो. रस्त्यावर अंधार आणि पाणी वगळता काहीही दिसत नव्हतं. गाडी बोटीसारखी तरंगतच जात होती. एकदा बाजूनी ट्रक गेला तेव्हा लाटेबरोबर लहानशी बोट हेलकावे घेते तशी गाडी वेडीवाकडी हिंदाकळली. पाचावर धारण बसणे. पोटात गोळा येणे, घशाला कोरड पडणे या सगळ्याचा अनुभव मी त्या दोन मिनिटात घेतला. डोळे मिटून बसण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं. कसाबसा मार्ग काढत दीड तासानी हॉटेलवर पोचलो.
पहिल्या प्रथम घरी आणि ऑफिसमध्ये मी सुखरूप(???!!) पोचल्याचं कळवलं. डीटेल्स मुद्दाम देत बसलो नाही. उगाच का टेंशन वाढवा ?
हॉटेलवर लाईट नव्हते. सुदैवानी माझ्याकडे दोन पावरब्यांक होत्या, त्यामुळे फोन चार्जिंगची चिंता नव्हती. खोलीत कासवछाप जळत होतं, त्यावरून डास असणार हे ताडलं. रात्री एक पुडा ग्लुकोज बिस्किट्स आणि एक कप कॉफी घेऊन एक डिसेंबरचा दिवस संपला.

दोन डिसेंबर :
सक्काळी सहालाच उठून आवरलं. थ्री पीस सूट, बूट घालून तयार झालो ( ड्रेसकोड होता म्हणून ). रूमचे पडदे उघडून बाहेर बघायला मला का सुचलं नाही कोण जाणे. बाहेर येउन बघतो तो पाऊस अजून जोमानी कोसळतोय !! निमूटपणे कोट बीट उतरवून ठेवला आणि आम्हा कोब्रांची सिग्नेचर हाफ प्यांट चढवली. चप्पल, टीशर्ट घालून खाली आलो. "ब्रेकफास्ट इल्लै सार, नो ट्राक कमिंग सार"… बोंबला… हॉटेलवाल्याचा कूक गायब झाला होता. शेवटी आम्ही लोकांनीच तयार पाकिटं आणून उपमा शिजवला आणि दहा रूम्समधल्या लोकांना नाश्ता दिला. चेन्नई ट्रेड सेंटरला तीन ते सहा डिसेंबर दरम्यान एक मेडिकल रिलेटेड प्रदर्शन होणार होतं, त्यात आम्ही एका क्लायंटचा स्टोल करणार होतो. सगळी तयारी झालेली होती. पण सेंटरच्या आत दीड फूट पाणी होतं. तारखा पुढे ढकलल्याची बातमी आली. आणि पुन्हा हॉटेलवर आलो. हॉटेलमध्ये स्थानिक, कॉर्पोरेट मधले उच्चपदस्थ, सारे सारे एक झाले होते… आमचं काम बोंबललंच होतं. विमानं बंद झाली होती, ट्रेन्स येत नव्हत्या. तेव्हा पुढील सूचना मिळेपर्यंत गपगुमान हॉटेलवर राहण्याचा निर्णय घेतला. रादर दुसरा काही ऑप्शन नव्हता. फोन्स बंद झाले, इंटरनेट गेलं. आणि खरी हतबलतेची जाणीव झाली. आमच्या हॉटेलवर असणारी BSNL ची चालू ल्यांडलाइन ही एकमेव आधार होती. दोनेकशे लोक तिथे फोन करायला रांग लाऊन उभे होते. आता चेन्नईत आणीबाणी लागली होती, आर्मीची हेलीकोप्टर्स दिसायला लागली. रस्ते बंद होऊ लागले. पोलिसच्या गाड्या दिसू लागल्या. लोक हजारांच्या संख्येनी रस्त्यावर फिरत होते. लाकडी आणि रबरी बोटी ट्रक मधून जाताना दिसायला लागल्या. आगीचे बंब आणि अम्ब्युलंस धावताना दिसायला लागल्या. एकून परिस्थिती खराब होती. हॉटेलवर मिळाले ते डाळ तांदूळ शिजवून हॉटेलच्या म्यानेजमेंटसकट आम्ही सगळे एकत्र बसून जेवलो.
त्या हॉटेलच्या नव्या म्यानेजमेंटनी ते हॉटेल २९ तारखेला खरेदी केलं होतं, आणि लगेच असा पाऊस होता, त्यामुळे गैरसोयीबद्दल त्यांनाच काय तर कुणालाच दोष देण्यात अर्थ नव्हता. जनरेटरच्या आवाजात, पेपरनी वारा घेत झोपी गेलो. दोन डिसेंबर संपला.

तीन डिसेंबर :
सकाळी जाग आली तेव्हा पाऊस भुरभुरत होता. अगदी लख्ख नसला तरी बर्यापैकी प्रकाश होता. चटकन आवरून बाहेर पडलो. हॉटेलच्या म्यानेजर बरोबर जाऊन ब्रेड, ज्याम, दूध, बिस्किटं, अंडी, सूप आणि उपमा वगैरेची तयार पाकिटं अशी सामग्री घेऊन आलो. उपमा आणि कॉफी नाश्ता केला. जनरेटरसाठी डीझेलचा जुगाड कुणी कसा केला माहित नाही, पण अचानक पन्नास पन्नास चे दोन ग्यालन भरून डीझेल हॉटेलवर सापडलं. आता किमान पंख्याची, फोन चार्जिंगची सोय झाली होती. भूक नव्हतीच. पुन्हा फिरायला बाहेर पडलो. रस्त्यावर सर्वत्र पोलिस होते. लोकांना मदत करत होते. हुल्लडबाजी अजिबात नव्हती. लोक शिस्तीनी रांग लावून मिळणारी मदत घेत होते. नंदम्बाक्कम मधली दोन मोठी हॉटेल्स - संगीता इन व्हेज आणि बुहारी नॉन व्हेज हीच फक्त चालू होती. संगीता मध्ये जेवायला गेलो. उत्तम चव. आता ही चव खरच उत्तम होती की दोन दिवस नीट जेवण न झाल्यामुळे मला उत्तम लागत होती माहीत नाही. काही का असेना, पोटभर, क्लीन जेवण मिळालं. तिथून समोरच चेन्नई वॉर सिमेट्री आहे, तो भाग पूर्ण पाण्याखाली होता. पुन्हा पाऊस सुरु झाल्यामुळे हॉटेलवर आलो. Laptop वर चार्ली चा गोल्ड रश बघत बघत झोपून गेलो. रात्री पुन्हा संगीता मध्ये जेवून झोपलो.
मला अनेक दिवसांपासून एकांत हवा होता. फोन बंद, कुणाशीही संपर्क नाही. आत्ता मिळत होता, पण नकोसा वाटत होता. असा अडकून पडलेला एकांत नको होता.
.
.
.
चार डिसेंबर :

आता मात्र फार म्हणजे फारच वैताग आला होता. सक्काळी पावसाची पर्वा न करता बाहेर पडलो. एका ठिकाणी नाकाबंदी दिसली. उगाच म्हणून तिथे घुटमळलो. पोलिसांनी लगेच कुठून आला, कुठे जायचं वगैरे चौकशी केली. मी मुंबईला जायचंय म्हणल्याबरोब्बर, तिथून जाणाऱ्या एका रिक्षावाल्याला धरलं आणि काहीतरी कुडमुड बोलणं झालं. दुपारी चार वाजता कोयम्बेडू म्हणून एक जागा आहे तिथून बंगलोरसाठी बसेस सुटतात अशी माहिती मिळाली. आता मात्र डोक्यात चक्र फिरायला लागली. तडक हॉटेलवर गेलो. ब्याग भरली. आणि रिक्षावाल्याची वाट बघत बसलो. पुन्हा त्याच चौकीवर जाउन मुंबई मुंबई अशी विचारणा केली. हे कोयम्बेडू नाव माझ्या काही केल्या लक्षात राहीना. पोलिसांनीच मदत करून एक सुमोवाला गाठून दिला. नऊ किलोमीटरसाठी पाचशे रुपये हा सौदा ठरला. हर हर महादेव म्हणत मी आता जे होईल ते बघून घेऊ अशा थाटात निघालो. पाऊस अजूनही रिपरिपत होताच. सुमोमध्ये सुद्धा सीटवर मांडी घालून, ब्यागा सीटवर ठेऊन बसावं लागलं इतकं पाणी होतं. मी मुंबईहून आलोय हे कळल्यावर त्या ड्रायव्हरला 'आजि म्या ब्रम्ह पाहिले' असा आनंद झाला. त्याचा धाकटा भाऊ धारावी मध्ये राहतो, प्लंबर आहे, आणि दोघे भाऊ गेल्या दहा वर्षांत भेटले नाहीयेत ही माहिती कळायला मला वीस मिनिटं लागली. एकदाचं ते कोयम्बेडू आलं, आणि पाचशे रुपये त्याच्या हातावर टेकवून गुडघाभर पाण्यात ब्याग कशीबशी खांद्याला लावून बसची वाट बघत उभा राहिलो. पावणेचार वाजता एक वोल्व्हो आली. क्लिनर बंगलोर बंगलोर ओरडतच होता. कसलाही विचार न करता थेट आत घुसलो. ( इथे, ट्रेन फलाटावर शिरत असतानाच उडी मारून आत शिरून जागा पकडण्याचा अनुभव कामी आला. ) सहाशे रुपये दिले, तिकीट घेतलं, आणि जरा जीवाला स्वस्थता लाभली. बस चारच्या ठोक्याला निघाली आणि भुकेची जाणीव झाली. मी नाश्ता, जेवण करायला साफ विसरलो होतो. आता ही बस सात वाजता थांबणार होती. चेन्नईच्या बाहेर पडताच फोनला रेंज आली आणि आलम मित्रमंडळीचे मेसेजेस, मिसकॉल अलर्ट्स यांनी फोन किणकिणत सुटला. सगळ्यांना फोन करून घेतले. मी सुखरूप आहे हे कळल्यावर त्यांनी सोडलेला सुटकेचा निश्वास मला तिथे ऐकू येत होता, जाणवत होता. सात वाजता बस थांबली. खाली उतरलो. ढाबाच होता. आधी दणकून जेवलो. आणि मग लहानसा श्रमपरिहार करून बस मध्ये येउन ताणून दिली. दहाच्या सुमाराला बंगलोर आलं. माडीवाला बस स्टोप ते म्याजेस्टिक बस स्टोप हे पंचवीस किलोमीटर अंतर कापायला तीनशे रुपये देऊन पावणे बाराला मुंबईला जाणारी बस हुडकू लागलो. सगळ्या बसेस फुल्ल होत्या. कारण विमानं, ट्रेन्स बंद झाल्यामुळे बस हा एकमेव मार्ग होता. वाट्टेल त्या किमतीला तिकीट विक्री चालू होती. रात्री बारा वाजता देखील बसतिकिटांचा काळाबाजार तेजीत होता. बंगलोर मुंबई तिकीट जनरली सातशे ते साडेसातशे असतं, तेच मला तीन हजारला घ्यावं लागलं. ते सुद्धा मिळालं नसतंच, दोन जन पण खूप जास्त प्यायलेले असल्यामुळे त्यांना बस मध्ये बसू देण्यास नकार देऊन ते एक तिकीट मला देण्यात आलं. पाऊण वाजता बंगलोर मधून बस सुटली. आणि मी गाढ झोपून गेलो. बेळगाव मध्ये नाश्त्यासाठी थांबलो, तिथून पुणे - मुंबई एक्स्प्रेसवे वरून वाशीला उतरलो.
वाशी ठाणे ट्रेन, मग ठाणे अंबरनाथ दुसरी ट्रेन… एकदाचा पाच डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजता घरात पोहोचलो.
.
.
.
या पूर्ण काळात कामाचं सगळ्यात जास्त टेन्शन होतं, कुणाबरोबर संपर्क होत नव्हता, आपण सेफ आहोत, हे इतरांना कळवण्याचा मार्गच नव्हता. पण स्थानिक लोकांची मदतीला तत्पर असण्याची वृत्ती सगळ्यात जास्त भावली. पोलिस, रहिवासी, कुणीही आक्रस्ताळेपणा करत नव्हते, च्यानेल्सवर देखील भिकार** चर्च्या झडत नव्हत्या. लोक आपली अक्कल पाजळण्यापेक्षा इतरांच्या सुरक्षिततेला जास्त महत्व देत त्याप्रमाणे कृती करत होते. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची जिगर दिसून येत होती.

चेन्नई, परत येईनच, तेव्हा मरीना बीच बघीन, बुहारी मध्ये जेवीन, आणि ट्रेड सेंटरच्या विस्तीर्ण ग्राउंड मध्ये रात्री फेरफटका मारीन.

PS :
मेधा ताईचे स्पेशल आभार, अजिब्बात ओळखदेख नसताना, केवळ KvD मेंबर म्हणून इतक्या आपुलकीनी माझी चौकशी करणं, माझ्याशी तिचा संपर्क होऊ शकत नव्हता, तेव्हा स्पेशल पोस्ट टाकून माझी खुशाली विचारणं, खरंच, I never expected this from anybody… ही treatment फार टचिंग होती… thank you मेधा ताई. मी जानेवारीत येणारे पुन्हा चेन्नईला, तेव्हा धम्माल करू… thanks once again :)

भेटत राहूच,
अण्णा बोका,
ओंकार आठवले.

वर्तुळ - कथा

वर्तुळ
.
.
.
.
.
रंगा आहे का ऑफिसात ??? त्याला म्हणावं सदूकाका आलाय... त्या चकचकीत बिल्डिंगच्या एकविसाव्या मजल्यावर असलेल्या आलिशान ऑफिसात शिरत सदूभाऊंनी खडा आवाज लावला...

Good afternoon sir, mr. Sadashiv paranjape wants to meet you, he doesn't have appointment, what should I say sir ?

रंगाच्या personal secretary ने आवाजात शक्य तितका मृदुपणा आणत विचारलं.

Send him in immediately !!!

Okay, sure sir... असं म्हणत सोनालीने सदूभाऊंना आत पाठवलं खरं पण मनातून ती उखडलीच होती. एक तर appointment नाही. त्यातून श्रीयुत श्रीरंग परांजपे म्हणजे, जवळपास 100 कोटींच्या कंपनीचे सर्वेसर्वा, अशा मोठ्या माणसाचा उल्लेख थेट रंगा म्हणून करणं हेही तिला अजिब्बात आवडलं नव्हतं.
त्या आलिशान ऑफिसात सदूभाऊ अगदीच odd वाटत होते. त्या typical corporate ऑफिसात धोतर, सदरा, कोट - टोपी अशा वेशात आलेल्या सदूभाऊंना पाहून अनेकांनी नाकं मुरडली होती, पण त्यांना boss च्या cabin मध्ये शिरताना पाहून सगळे गप्प झाले.

काका, काय हे, अरे फोन तरी करायचास, गाडी पाठवली असती आणायला, मी स्वतः आलो असतो...
ते असू दे रे, तू बोललास यात सगळं आलं... आम्हाला आपली st बरी... असो..
मुद्द्याचं बोलतो, यंदा गणपतीला तू घरी हवायस काकूस तुझ्या. तेव्हा तुझ्या मिटींगा आणि दौरे काय ते बघ आणि चांगला आठवडाभर तरी येच.

होय काका, बघतो नक्की असं मोघम बोलून रंगाने आपल्या ड्रायव्हरबरोबर काकांना घरी पाठवलं.

रंगा परांजपे खरा म्हणजे अस्सल कोकणी... वडिलांच्या मागे काकांनी त्याला वाढवला. खूप जीवतोड मेहनत करून शिकलेल्या रंगाने रूढ अर्थाने सगळी सुखं मिळवली होती.

पण त्याचं मन आताशा कोकणात रमत नसे. काकू लग्नाचा विषय नेहमी काढत असे. त्याची होऊ घातलेली सुमी समुद्राने गिळल्यानंतर तर नुसतं कोकण म्हणलं तरी त्याला राग येई. सुमीच्या आईवडिलांशी तर त्याने साफ संबंध तोडून टाकले होते. खरं तर त्यांच्या समोर जायची हिम्मतच त्याला होत नव्हती. गेली साताठ वर्ष तर गणपतीत सुद्धा तो कोकणात गेला नव्हता. मुंबईत मोठ्ठा बंगला, नोकरचाकर, गाड्या सगळं होतं. Business उत्तम चालला होता. काहीही असलं तरी सध्या फक्त आणि फक्त कामच त्याला दिसत असे. लग्न करायचं नाही हे त्यानी ठरवून टाकलं होतं. अत्यंत यशस्वी असलेला रंगा आतून मात्र disturbed, अपूर्ण होता. सकाळी gym, नंतर कुत्र्यांना walk ला नेणे, नंतर ऑफिस, meetings, आणि संध्याकाळी आपल्या आवडत्या Glenfiddich स्कॉचचे घुटके घेत घेत गझल्स ऐकणं हे तो नित्य करायचा. आयुष्यात कोणाची गरज त्याला वाटतच नव्हती.

यंदा मात्र काकूचा आग्रह मोडावासा त्याला वाटेना. अचानक त्याच्या मनानी उचल खाल्ली आणि सगळ्या team leaders ना त्याने एक mail करून आपण 15 दिवस सुट्टीवर जात असल्याचं कळवून टाकलं. Accounts बरोबर बोलून पाच सहा cheques लागलेच तर म्हणून sign करून ठेवले, आणि अतिमहत्वाचं काम असल्याशिवाय फोन न करण्याच्या standing instructions पूर्ण ऑफिसला दिल्या.

सोनालीला सुद्धा सर असे काय करतायत हे कळेना.

इकडे रंगाच्या बंगल्यात काका जेवणखाण करून शांत पहुडले होते.

रंगा तडक घरी आला, इतक्या लवकर साहेब आलेले पाहून जरा सुस्तावलेला watchman पण गडबडला, पण लगेच सावरत कडक सलाम ठोकत त्यानी गेट उघडलं. घराच्या पोर्च मध्ये येऊन रंगानी त्याचा signature double horn मारला आणि काका ताडकन उठले.

काका, आपण आत्ता निघतोय... आत्ता...
अरे पण तुझी कामं..... वाक्य सुद्धा पूर्ण करू न देता काकांचं सामान गाडीत ठेवण्याच्या सूचना दिनेशला गेल्या आणि तात्काळ अंमलबजावणी झाली.

साहेब मी फक्त अर्ध्या तासात बॅग घेऊन येतो, please थांबा... दिनेश म्हणाला.

दिनेश, तू 15 दिवस सुट्टी घे, मी स्वतः drive करत जाणार आहे गावी. दिनेशला धक्काच बसला...
Ok साहेब असं म्हणत तो निघून गेला.

थोड्याच वेळात रंगाच्या दणदणीत bmw suv मधून गावच्या दिशेने प्रवास सुरु झाला...

रंगा, मला वाटलं नव्हतं तू तयार होशील, आणि इतका पटकन, हे तर शक्यच वाटत नव्हतं...

काका, गावात गेल्यावर कळेल तुला काय ते. काही हिशोब पूर्ण करायचेत...

काकांना निवांत झोप लागली आणि रंगानी सुसाट गाडी दामटली.

घरी पोचताच रंगा काकूच्या पायावर वाकला. काकूच्या डोळ्यात अश्रूच आले. आता नाही हो काढायची ती लग्नाचा विषय असं म्हणत काकांनी जरा प्रसंग हलका केला.

काकूच्या हातचा साधासा आमटीभात खाऊन रंगा - शंभर कोटींचा मालक चक्क चटईवर पडवीत झोपला !!!

सकाळी उठला तेव्हा तो काही वेगळाच वाटत होता. Charged अगदी !!! त्यानी गोठ्यात जाऊन धार काढली, नंतर गड्यांबरोबर वाडीत फिरून आला. तो लहान असताना त्याने काकांना मदत करत लावलेली झाडं आता पुष्कळ मोठी झाली होती... उत्साह भरून आला होता. किती तरी वर्षांनी त्या घराने आज हसण्याचे, मोठ्याने गप्पांचे आवाज ऐकले होते.

गणपती दणक्यात साजरे झाले. रंगाने स्वतः खपून सगळी सजावट केली होती. विसर्जन कालच झालं होतं. सगळी आवराआवर झाली होती. दुपारी सामसूम झाल्यावर हा एकटाच बाहेर पडला आणि थेट सान्यांच्या दारात दत्त म्हणून उभा ठाकला.
सुमीने आणि त्याने एकत्र दारात लावलेला प्राजक्त कोरडा पडला होता... त्याच्या नजरेवर चराच उमटल्यासारखं झालं एकदम... सुमीच्या आठवणीने त्याला गहिवरून आलं.

अण्णा साने दुपारचा शिंचा कोण आलाय असं म्हणत बाहेर आले ते थबकलेच एकदम.

काका, मीच आहे. तुमचा रंगा !!! 'तुमचा' वर जोर देत रंगा म्हणाला.
काका, सुमी गेल्यावर मी फार वाईट वागलो तुमच्याशी. तुम्हाला गरज होती आधाराची आणि मी निघून गेलो मुंबईला. सदूकाकांनासुद्धा जुमानलं नाही मी. पण आता पुरे. आता तुम्ही सगळ्यांनी मुंबईला यायचं. इतकं मोठं घर आहे, नोकरचाकर आहेत, गडगंज पैसा आहे. पण असतं कोण त्या घरात, मी आणि माझे कुत्रे. माणूस नाही कोणी माझं. काका काकूला मी बोललोय आधीच. आणि ते तयार आहेत, तुम्हीही चला. माझं हे कर्ज मला फेडू द्या. होणारा जावई होतो ना मी तुमचा, त्या हक्कानी या...

अरे पण इथलं कोण करेल सगळं ??

त्याची काळजी नको. माझ्या खास मर्जीतली आणि अत्यंत विश्वासू माणसं आमच्या आणि तुमच्या पूर्ण property ची काळजी घेतील, तुमच्या संमतीशिवाय कोणताही कारभार केला जाणार नाही, एक आंबा सुद्धा उतरवला जाणार नाही. आता या वयात इतकं सगळं निस्तरताना तुमची दमछाक होतेय. आता पुरे ना अण्णा... आता आमची वेळ आहे करायची.
तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही इथे यायचं... काही विचार न करता. मुंबईत मी सुमीच्या नावाने trust केला आहे, तो तुम्ही चौघांनी मिळून चालवायचा.

अण्णांकडे बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं... माई नि:शब्दपणे आतून हा सगळा संवाद ऐकत होत्या. माईंनी नजरेनेच अण्णांना होकार दिला.
मागे येऊन उभे राहिलेले काका, हळूच डोळे टिपत होते.

सामानाची बांधाबांध होऊन मंडळी परत यायला निघाली.
वर्तुळ पूर्ण होत होतं... तुटू पाहणारी नाळ पुन्हा जुळत होती.
काही बाकी राहिलेले हिशोब पूर्ण होत होते... सगळ्या बेरजा वजाबक्या करून टोटल नीट tally होत होती... आणि सान्यांच्या दारच्या प्राजक्ताला नवी पालवी फुटत होती...

बोका :)

अनुष्का शंकर

मोजक्या साधनांच्या आधारे स्वर्ग कसा निर्माण करावा हे जर कोणाला शिकायचं असेल तर त्याने अनुष्का शंकरला सतार वाजवताना पाहावं...

सतारीच्या मुख्य सहा सात तारा, अमाप उत्साह, अंगात उपजत असलेली लय, वडिलोपार्जित सफाई आणि पाचवा पंचम मानला गेलेला अतीव मोहक चेहरा... आहा... तिने वाजवत राहावं आणि आपण ऐकत राहावं...

अनुष्का शंकरला पहिल्यांदा मी ऐकलं 2010 साली... youtube वर रवि शंकरांबरोबर सतार वाजवतानाचा तिचा video पाहिला होता. आणि त्यानंतर आता असं झालंय की रविजींचे videos जवळपास बघतच नाही मी.

वादनातली सफाई, नजाकत काय असते ते कळण्यासाठी तिचा live at कार्नेजी हॉल ची सिरीज पहा... आहाहा..
वीज आहे अक्षरश बोटांत. आपण ऐकताना दमून जातो आणि ती मात्र एखादा पल्लेदार piece वाजवून 'जागा' घेते तेव्हाची ती कातील स्माईल बघावी....
अफाट आहे ही पोरगी...

भारतात आलेली तेव्हा एक concert केलेली मध्ये, मी आणि माझा एक खवचट पण अतीव दर्दी मित्र असे गेलो होतो...

कसं वाटलं वगैरे विचारलं नंतर त्याला मुद्दाम... मान उतरवून देतो म्हणाला...

असो, लिहिलेलं असंबद्ध वाटू शकतं... ऐकावं की लिहावं असा प्रॉब्लेम झालाय...

Anoushka प्रेमी बोका

मैत्रिदीन

#kvdमैत्रीदिन

बरेच महिने काही संपर्क नाही, फोन केला आणि कितीही मोठे ( वयाने, आणि अजून कशाकशाने ) झालो असलो तरी फोनवर हॅलो ऐवजी ' काय रे xxxच्या, कुठे तडमडतोयस ? ' असं आपसूक विचारलं जाणं आणि समोरच्यानेही 'आता परसाकडे जाताना सुद्धा तुला सांगून जात जाईन... ' असं सहज म्हणणं, म्हणजे मैत्री.

सोड ना बे, गेली ती गेली, मी बघतो ना तुझ्यासाठी दुसरी, अजून भारी... हे वाक्य बस, टॅक्सी, नोकरी आणि चक्क छोकरी बद्दलसुद्धा मनापासून बोलणं म्हणजे मैत्री.

मित्राचे प्रताप अगदी साळसूदपणे लपवणं म्हणजे मैत्री.

धूर काढणं, उनाडक्या करणं वगैरे नाही त्या सवयी लागल्यात हे कळताच, आपण कुठे आहोत, आजूबाजूला कोण आहे याचा विचार न करता थोबडवून काढणं म्हणजे मैत्री.

This person is my closest friend आणि आम्ही आयुष्यभर बोलत राहणार आहोत, तुला काही problem असायचं कारण नाही, and I mean every single word of this statement...  हे वाक्य असंच्या असं आपल्या होणाऱ्या पार्टनरला थेट सांगणं म्हणजे मैत्री.

पार्टनरशिप मध्ये झालेल्या गैरसमजांमुळे एकमेकांवर दिवाणी दावे लावलेले असले तरी एखाद्या शनिवारी फोन करून 'चल रे जरा, चहा मारून येऊ' असं म्हणणं म्हणजे मैत्री.

'काका, याची काळजी तुम्ही करू नका, आम्ही आहोत, असं आपल्या वडिलांना सांगणं, पण आपल्याला 'लेका, फादर आहेत तुझे म्हणून खोटं सांगतोय, अभ्यास तुझा तुलाच करायचा आहे, आम्हाला काही येत नाही ' असं ठणकावणं म्हणजे मैत्री.

होणाऱ्या बायकोसमोर आपल्या  नसलेल्या गुणांचं रसभरीत वर्णन करून आपल्याला धर्म संकटात टाकणं म्हणजे मैत्री.

कितीही गॅप नंतर last call च्या विषयापासून बोलायला सुरु करणं म्हणजे मैत्री.

तुम्हाला genuinely हव्या असलेल्या पण budget नसलेल्या वस्तू सहज म्हणून गिफ्ट करणं म्हणजे मैत्री.

असं अजून बरंच काय काय आहे, तूर्तास इतकंच !!!

मित्र बोका