दिवाळीची दहा दिवस सुट्टी मिळेल का ?? चिखलात हात बरबटवून शिवाजींचा किल्ला करायचाय, त्यावर मावळे ठेवायचेत. थोडा वेडावाकडा का असेना, आपल्या हातानी, आपल्या आवडीचा चांदणीचा कंदील करून लावायचाय, बाबा भारीतले कपडे घेऊन देत असताना सुद्धा, फक्त दुसरा रंग आवडतो म्हणून साधेच कपडे घ्यायचेत, एक दोन वेळाच घातलेले छान कपडे शहाण्या मुलासारखे गाडी धुणाऱ्या भय्याच्या मुलाला द्यायचेत, पाचशे रुपयांत येणारे थोडेसेच पण मला भरपूर वाटणारे फटाके उडवायचे आहेत. कॉलनीच्या वॉचमनला सक्काळी उटणं, तेल नेउन द्यायचंय. आजीकडून तेल उटणं लावून घेऊन मग चांगलं अंग रगडून घ्यायचंय… अंघोळ घालून घेताना आजीच्या अंगावर हळूच पाणी उडवायचंय… झाडूवाल्या अम्माला पिशवीभर फराळ द्यायचाय. सक्काळी चिल्ल्यापिल्ल्या मुलांबरोबर फटाके उडवत गोंधळ घालायचाय, भुईचक्राच्या ठिणग्यांत उड्या मारायाच्यात, फराळाचा नैवेद्य कधी एकदाचा दाखवून होतोय याची वाट बघायचीय. रव्याच्या लाडवांचा अक्खा डबा माझा एकट्याचा आहे हे सिद्ध करायचंय. पुन्हा एकदा सुतळीबॉम्बच्या ठाणकन आवाजानी दचकायचंय… दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला बाबांबरोबर जाऊन भर मैफिलीत डुलक्या काढायच्यात… मग पुन्हा दिवसभर गाव उंडारायचय… संध्याकाळी दमून घरी यायचंय…. "खेळायला जाता का मातीत लोळायला रे कार्ट्यांनो ?? काय त्या नवीन कपड्यांचं पोतेरं केलंय" हे पुन्हा एकदा ऐकायचंय. दिवाळीनिमित्त घरी आलेल्यानी दिलेले खाऊचे पैसे अर्धे अर्धे करून आईच्या पर्स मध्ये, आणि बाबांच्या खिशात हळूच ठेवायचेत. पाचशेच्या नोटेचे अर्धे अर्धे कसे करायचे या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. फटाक्यांच्या आवाजाला लहान भाऊ घाबरतो म्हणून दादा लोकांना जाऊन विनंती करायचीय... कॉलनीच्या राखणदार खंड्याच्या मागे फटाके लावणाऱ्या टग्याच्या घरासमोर सुतळीबॉम्ब आणि लक्ष्मी बॉम्बचा कंबाईन धमाका करायचाय…
.
.
.
.
हे असं आणि अजून बरंच काही करायचंय… फक्त काही ठिकाणी वयोमानपरत्वे मला फुटलेली शिंगं आड येतात. ही शिंगं काढताही येत नाहीत. कामांतून वेळ मिळत नाही. कलात्मक, छान गुळगुळीत, प्रमाणबद्ध कंदील पैसे टाकले की रेडीमेड मिळतात. अम्माला थोडा थोडाच फराळ पुरतो, कपडे हवे तसे, किमतीचा विचार न करता घेता येतात. आजी आता अंघोळ घालत नाही. कॉलनीत कुणीच आता फटाके उडवत नाही. लहान भाऊ आता दादागिरी करतो, कपडे कटाक्षानी सांभाळले जातात, खाऊच्या पैशाऐवजी घरात खाऊच आणला जातो… पुरेसा पैसा आहे पण व्यवधानं इतकी वाढलीत, वेळ कमी वाटतो…
पुन्हा एकदा लहान व्हायचंय, यंदाच्या दिवाळीत जमेल तसे पुन्हा जुने दिवस अनुभवणार आहे, फक्त सुट्टी मिळाली पाहिजे.
.
.
दिवाळीप्रेमी बोका,
ओंकार आठवले
Monday, May 29, 2017
खरी दिवाळी
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment