Powered By Blogger

Monday, May 29, 2017

नशिबाचे भोग !!!

काही नशिबं देव अशी का लिहितो याला काही उत्तर नाही. हेच बघा ना, हा एका चौकोनी कुटुंबाचा भाग होता. आई, वडील, मोठा भाऊ आणि हा धाकटा. सुसंस्कृत ब्राह्मण घराणं. आई प्रचंड शिस्तीची होती. इतकी कडक, की टीव्ही वरची गाणी वगैरेही पाहू देत नसे. वडील मात्र एकदम मुलायम व्यक्ती. गात बित असत. वडील - मुलाचं एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं. वडिलांचं आणि याचं छान पटायचं. आईच्या रागापासून अनेकदा वडिलांनीच त्याला वाचवलं होतं. हा लहानपणापासूनच जरासा बंडखोर. शिक्षण, अभ्यास वगैरेंचा तिटकाराच त्याला. लहान होता तोवर त्याच्या खोड्या पचत असत. पण आता वय वाढत होतं. मोठा भाऊ शिक्षण, लग्न करून दूरवरच्या गावात स्थाईक झाला, आणि मुलं बाळं, संसाराच्या व्यापात रमला. हा मात्र असाच, बेफिकीर. आई मध्यंतरीच गेली होती. याला मोकळं रान मिळाल्यासारखं झालं. वडील आता थकले होते. तसं बघावं तर त्यांना याचाच आधार होता. पण याला मात्र काही जाणीव नसावी. कुसंगतीमुळे हा बिघडतच गेला. दारू, जुगार फार वाढत गेले. घेणेकरी दारावर येऊ लागले. वडील फार अगतिक झाले होते. पै पै करून त्यांनी जमवलेली पुंजी अशी वाऱ्यावर उडू लागली होती. एक दोन वेळा फार पुढपर्यंत गेलेली मुलींची प्रकरणं फक्त वडील मध्ये पडल्यामुळे कशीबशी मिटली होती. तसा हा मनानी सज्जन असावा. राजकारणावर त्याचं फार प्रेम. पुस्तकं वाचत बसायचा. मशिनरी रिपेरिंगच्या एका दुकानात त्याला नोकरी मिळाली होती, पण अस्थिर स्वभावामुळे ह्यानी सोडून दिली. याचा इन्कम सोर्स नक्की काय असावा हा आम्हाला नेहमी प्रश्न असे, कारण कपडे, मोबाईल, सेंट वगैरे टापटीप असत. वृद्ध वडील अचानक आजारी पडले आणि ध्यानी-मनी नसताना पाचच दिवसांत गेले. यानी तशी बरीच सेवा केली. पण त्यांच्या जाण्यामुळे हा फार बिथरला. दिवसरात्र दारूत बुडून राहू लागला. आधीच असलेली कुसंगत, त्यात खायला उठलेलं घर, आणि साफ एकटेपण. हा हा म्हणता जवळपास लाख दीडलाखभर रुपये यानी दारूत फुकून टाकले. वडिलांनी जवलेली सगळी पुंजी संपत चाललेली, काम धंदा काही नाही, त्यात दारू आणि नको ते मित्र चिकटलेले. भावानी हात वर केलेले. याची ओढाताण सुरु झाली. हा आता कमीत कमी खर्चात जगायला शिकत होता. त्याला ओळखणाऱ्या काही भल्या व्यक्तींनी त्याला सुधारायचे बरेच प्रयत्न केले, काहींनी बऱ्या पगाराची नोकरी सुद्धा लावून दिली. मुळात असलेल्या गोड बोलण्यामुळे आणि बऱ्यापैकी व्यक्तीमत्वामुळे त्याचा जम बसतोय असं वाटत असतानाच त्यानी मला हे काम जमत नाही असं म्हणून हात वर केले. याला धंदा काढायचा होता. पण धरसोड वृत्तीमुळे कुणी विश्वास ठेवेनात. शेवटी प्रश्न पैशाचा होता. कशात काही नसल्यामुळे याचं लग्नही होत नव्हतं. हळूहळू चांगल्या लोकांनी याच्याशी संपर्क कमी केला होता. हा आपल्याच विश्वात असे. अधून मधून फोन बिन करत असे. अजूनही करतो… आता वयाची हाफ सेंच्युरी होऊन गेलीय. अजूनही याच्या इन्कम सोर्स बद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. दारू बेसुमार वाढलीय. तब्बेत इतकी खराब झालीय की लोक ओळखू शकणार नाहीत. अजूनही आम्ही रस्त्यात भेटतो, ओळखीचं हसतो, दोन शब्द बोलतो, पण त्यात पूर्वीची आत्मीयता नसते. एक प्रकारचा दुरावा दाटलेला असतो. असो, आता याची काळजी करावीशीही वाटत नाही. अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न करून सुद्धा हा माणूस का सुधारत नाही हे कोडं सोडवावंसं वाटत नाही. काही नशिबांचं प्रोग्रामिंग करताना देव सुद्धा मस्करी करत असतो, आणि संपूर्ण आयुष्याचं कोडं होऊन बसतं. "देवा, याला लाईनवर आण" असं नक्की कोणत्या देवाला विनवायचं हे आमच्या लक्षात येत नाही. 'आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना' हेच खरं. असो… चमत्कारावर थोडासा का होईना विश्वास ठेवायला हवा. अनेकांना बर्यापैकी सुधरवणाऱ्या आम्हा शेरांना हा एक सव्वाच नाही, दीड शेर भेटलाय हेच खरं…

इस मामले मे, शेर से बिल्ली बना हुआ बोका,
ओंकार आठवले

No comments:

Post a Comment