या वक्तव्याबद्दल मला लोक्स वेडं म्हणतील, पण तरीही,
विक्रम गोखल्यांचा राम्या हा नानाच्या गणपतरावांपेक्षा निश्चित उजवा आहे. सविता ताईंचं पात्र काही ठिकाणी संवादफेकीत गडबडतं, पण ते दुर्लक्ष करण्याजोगं आहे.
अप्पासाहेबांच्या रंगभूषा, वेशभूषा, देहबोली, उच्चार, मुद्राभिनय या सगळ्यांवर 'नाना' ची अमीट छाप आहे. हा नाना आहे, नटसम्राट नाही, हे सदैव जाणवत राहतं, कितीही प्रयत्न केला तरीही...
जेव्हा जितेंद्र जोशीला नाना भर प्रयोगात सुनावतो, तेव्हा हाच नटसम्राट, त्याच्या नातीच्या शाळेतला लावणीचा नाच असा बसवून घेऊ शकेल हे मान्य करवत नाही.
अजित परबला नक्की काय विचार करून घेतलं, हे कोडंच आहे. तसंच शेवटच्या प्रसंगात, बुटपॉलिश करणाऱ्या मुलाला पोलीस कानफडात का मारतो ते ही कोडंच आहे. फक्त त्या जळलेल्या थेटरातच दिसणारा तो लांब केस वाला मुलगा नक्की कोण हे मला तरी कळलेलं नाही.
बाकी, ज्यांनी लागूंचं त्यांच्या तरुणपणातलं नटसम्राट पाहिलं नाहीये, त्यांना हा चित्रपट फार भावेल यात शंका नाही.
नानाचे सगळे डायलॉग्स त्यानी त्याच्या स्टाईलनी केले असले तरी छान आहेत. राम्या बेडरिडन असताना झालेली एक नाट्यप्रवेशाची उजळणी भन्नाट.
सर्व कलाकारांनी आपापली कामं चोख केलीत. मात्र पूर्ण चित्रपटात दारूचा इतका उपयोग / उल्लेख करायला नको होता हे मात्र नक्की. मुलीच्या अनिव्हर्सरी च्या प्रोग्रॅम मध्ये 'टू पी ऑर नॉट टू पी' असं म्हणणं हे अजिबात पचनी पडणारं नव्हे.
असो... एकदा पहायलाच हवा असं मला तरी वाटतं. किंवा शेवटची फक्त वीस मिनिटं, खास अस्सल नट बघण्यासाठी !!! पिक्चर संपल्यावर अनेक जाणत्या प्रेक्षकांनी अखंड पाच मिनिटं केलेला टाळ्यांचा गजर अनुभवण्यासाठी !!!
लेखकू बोका,
ओंकार आठवले


No comments:
Post a Comment