Powered By Blogger

Monday, May 29, 2017

मोदक

आजकाल काय वाट्टेल त्याचे मोदक करतात. आंबा काय, काजू काय, चोकलेट काय, मध्यंतरी मी आईसक्रीम मोदक हा भयानक प्रकार सुद्धा ऐकला. आंब्याच्या वड्या असतात, काजूकतली असते, पण उकडीचे मोदक हे फक्त उकडीचे मोदकच असतात. मोदक हे उकडीचेच असावेत. फार फार तर तळलेले चालवून घेऊ. पण त्यात गूळ नारळाचेच सारण हवे. उकडीचे उत्तम मोदक करणे ही सुद्धा एक कला आहे. येरागबाळ्याचे ते कामच नोहे. हे काम शक्यतो किमान तीस वर्षांचा अनुभव असलेल्या आजीकडूनच करून घ्यावे. पत्नी, बहीण, मुलगी यांना काय वाटायचं ते वाटो. आंबेमोहर / बासमती तांदूळ समक्ष दळून आणावा. यात भय्या गव्हावर तांदूळ दळत नाहीये याची दक्षता घ्यावी लागते. आजीला आपण स्वतः नारळ खवून द्यायचा असतो. गूळ आणि वेलची जरा सढळ हस्ते पडू द्यावी. उकड परफेक्ट झाली नाही तर हे काम फिस्कटतं. पारी कदापि मोडता कामा नये. मोदक हे हातानेच तयार झाले पाहिजेत. साच्यात घालून केलेले मोदक म्हणजे अगदीच सरकारी छापील फॉर्म सारखे नीरस वाटतात. त्यात स्वहस्ते लिहिलेल्या प्रेमपत्राचा गोडवा नसतो. मोदक जास्त उकडले जाता कामा नयेत. नुकताच उकडलेला मोदक, भाजणारे हात सांभाळत शेंडीच्या बाजूनी उघडून त्यात घट्ट साजूक तूप घालून, पोळणाऱ्या जिव्हेची पर्वा न करता तोंडात सोडता यायला हवा. यासाठीची जी योगसाधना असते ती बालवयापासून व्हायला हवी. उकडीचे मोदक ऐन गणपतीच्या दिवसांत सुद्धा न खाणाऱ्या लोकांकडे मी केवळ भूतदयार्द्र नजरेनेच बघतो. उकडीचे मोदक खाण्याच्या पैजा लागायला हव्यात, त्याआधी स्वयंपाकघर सांभाळणारे हात तितक्याच तयारीचे आहेत याची खात्री करून घ्यावी. 'उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म' हे स्मरणात ठेवून किमान एकवीस मोदकांची आहुती या यज्ञकर्मात द्यावी, एखाद दोन मोदक खाउन उठणाऱ्याने हे मोदक खाऊच नये या मताचा मी आहे. असो, मोदक या विषयावर एकदा लिहायला सुरुवात केली की तेच हात मोदक तोंडापर्यंत नेऊन सोडल्याशिवाय स्वस्थ होत नाहीत. वाफाळते मोदक वाट बघतायत. आलोच…

मोदकखाऊ बोका,
ओंकार आठवले

No comments:

Post a Comment