#kvdमैत्रीदिन
बरेच महिने काही संपर्क नाही, फोन केला आणि कितीही मोठे ( वयाने, आणि अजून कशाकशाने ) झालो असलो तरी फोनवर हॅलो ऐवजी ' काय रे xxxच्या, कुठे तडमडतोयस ? ' असं आपसूक विचारलं जाणं आणि समोरच्यानेही 'आता परसाकडे जाताना सुद्धा तुला सांगून जात जाईन... ' असं सहज म्हणणं, म्हणजे मैत्री.
सोड ना बे, गेली ती गेली, मी बघतो ना तुझ्यासाठी दुसरी, अजून भारी... हे वाक्य बस, टॅक्सी, नोकरी आणि चक्क छोकरी बद्दलसुद्धा मनापासून बोलणं म्हणजे मैत्री.
मित्राचे प्रताप अगदी साळसूदपणे लपवणं म्हणजे मैत्री.
धूर काढणं, उनाडक्या करणं वगैरे नाही त्या सवयी लागल्यात हे कळताच, आपण कुठे आहोत, आजूबाजूला कोण आहे याचा विचार न करता थोबडवून काढणं म्हणजे मैत्री.
This person is my closest friend आणि आम्ही आयुष्यभर बोलत राहणार आहोत, तुला काही problem असायचं कारण नाही, and I mean every single word of this statement... हे वाक्य असंच्या असं आपल्या होणाऱ्या पार्टनरला थेट सांगणं म्हणजे मैत्री.
पार्टनरशिप मध्ये झालेल्या गैरसमजांमुळे एकमेकांवर दिवाणी दावे लावलेले असले तरी एखाद्या शनिवारी फोन करून 'चल रे जरा, चहा मारून येऊ' असं म्हणणं म्हणजे मैत्री.
'काका, याची काळजी तुम्ही करू नका, आम्ही आहोत, असं आपल्या वडिलांना सांगणं, पण आपल्याला 'लेका, फादर आहेत तुझे म्हणून खोटं सांगतोय, अभ्यास तुझा तुलाच करायचा आहे, आम्हाला काही येत नाही ' असं ठणकावणं म्हणजे मैत्री.
होणाऱ्या बायकोसमोर आपल्या नसलेल्या गुणांचं रसभरीत वर्णन करून आपल्याला धर्म संकटात टाकणं म्हणजे मैत्री.
कितीही गॅप नंतर last call च्या विषयापासून बोलायला सुरु करणं म्हणजे मैत्री.
तुम्हाला genuinely हव्या असलेल्या पण budget नसलेल्या वस्तू सहज म्हणून गिफ्ट करणं म्हणजे मैत्री.
असं अजून बरंच काय काय आहे, तूर्तास इतकंच !!!
मित्र बोका


No comments:
Post a Comment