अजून पण पाठ दुखतेय माझी. काय करू कळत नाहीये मला. आता मला नाही राहवत ना, लहानपणापासूनची सवय आहे, अशी कशी मोडेल ? पण या सवयीपायी आज माझी पाठ मोडणार होती. तर काय सांगत होतो मी, काल रात्री मस्त जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे ताक प्यायला म्हणून मी फ्रीज उघडला, आणि तसाच परत बंद केला. आज मला ताकापेक्षा पण भारी काहीतरी दिसलं होतं फ्रीजमध्ये. हळूच आजूबाजूला बघून घेतलं, कुणाचं लक्ष नाहीये ना. सगळे जण टीव्ही वर बातम्या बघण्यात गुंग होते, आणि मी जरासा निश्चिंत झालो. मग पुन्हा अजिब्बात आवाज न करता फ्रीज उघडला. पातेलं बाहेर काढलं. ओट्यावर ठेवताना बारीकसा आवाज झाला. आणि तो मस्त पांढराशुभ्र, लुसलुशीत, जाड थर एका बाजूनी पातेल्यापासून अलगद सोडवला. त्याचे दोन भाग केले. आणि हळुवारपणे उचलून तोंडात टाकले. अहाहा… सुख रे बाबा सुख. मी अशा उन्मनी अवस्थेत असतानाच घात झाला… आजी माझ्या मागे उभी होती. आता करावं तरी काय मी. हातात दुधाचं भरलेलं पातेलं, त्या दुधावरची सगळीच्या सगळी साय माझ्या तोंडात, आणि मागे आजी उभी हातात लाटणं घेऊन. मी त्यातल्या त्यात प्रसंगावधान दाखवून पातेलं पुन्हा ओट्यावर ठेवलं. हो, दूध नको सांडायला. पातेलं ओट्यावर ठेवायला आणि लाटण्याचा जबरी फटका माझ्या पाठीवर बसायला एकच वेळ आली. गार दूध, साय, दही, ताक हे आणि दुधाचे अनेक पदार्थ हा माझा वीकेस्ट पोइन्त आहे. आणि आजीचे नेहमीचे पट्टे सुरु झाले… "एवढे मोठे घोडे झाले तरी अजून चोरून साय काय खातात. दूध काय पितात. आता दारात दोन म्हशी बांधणार आहे मी. एक आमच्यासाठी आणि एक फक्त तुम्हा पोरांसाठी. प्या किती हवं तेवढं दूध मग." आता यावर " खरंच सांगतेस !!! थ्यांक यू हां आजी" असं मी म्हंटल तर माझं काय चुकलं सांगा… ज्या वयात मुलं चोरून किंवा उघडपणे इतर काहीबाही द्रव पदार्थ पितात, त्या वयात आम्ही पौष्टिक द्रव पितोय तर कौतुक करायचं सोडून लाटण्याचा मार !!?? काल मोजून सहा फटके खाल्लेत मी… बहुत नाइन्साफी है ये… असो, सक्काळी उठून दोन लिटर दूध आणून देण्याच्या बोलीवर काल माझी सुटका झाली. पण दारात म्हैस बांधण्याचा आजीनी सुचवलेला पर्याय काही वाईट नाही, काय मंडळी !!!
.
.
.
दूध का धुला बोका,
ओंकार आठवले.
Monday, May 29, 2017
दुधाची चोरी
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment