Powered By Blogger

Monday, May 29, 2017

रेल्वे टिप्स

मुंबईकर होऊ इच्छिणाऱ्या तसेच मुंबईत राहणाऱ्या पण लोकल ट्रेनच्या प्रवासाची भीती असणाऱ्या लोकांसाठी काही खास….

आपल्या गंतव्य स्थानी नक्की किती वाजता पोहोचायचं आहे हे निश्चित करावं. त्यानुसार ट्रेन निवडावी. यात एक दोन ट्रेन आधीच्या निवडणे सोयीस्कर. एखाद्या ठिकाणी वेळेच्या आधी पोचून टाईमपास केलेला इष्ट. m-indicator हे अतिशय उपयुक्त app वापरावे. उदा. मला ऑफिसला १० वाजता पोचायचं असतं. अंबरनाथहून ८:२७ ची फास्ट ट्रेन घाटकोपरला ९:१५ ला पोचते. तिथून पुढच्या ५ मिनिटात मेट्रो मिळून, मी ९:४५  ऑफिसला पोहोचतो. म्हणजे वेळेच्या १५ मिनिटे आधी. त्यामुळे ट्रेन ५ १० मिनिटे लेट झाली तरी फार प्रोब्लेम होत नाही.

आपण राहत असलेल्या स्टेशनहून निघणारी ट्रेन शक्यतो निवडावी. म्हणजे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण वगैरे… शक्य असेल तर डाऊन करून जावे. या प्रकारात वेळ मात्र जास्त जातो. बसायला मिळायची खात्री असते. उतरायच्या स्टेशनच्या एक स्टेशन आधी आपली जागा सोडावी. मुलुंडला उतरायचं असेल तर कळवा सोडलं की लगेच बाहेर यायच्या तयारीत राहावं.

ट्रेनमध्ये उभं राहावं लागलं तर 'मी तिकिटाचे / पासाचे पैसे दिलेत' हे खरं असलं तरी अघळपघळ राहू नये. आपला एक हात खिशावर ( सेफ्टी ) ठेवून दुसर्याने ह्यांडील पकडावे. सावध उभे राहावे. पुढील स्टेशन कोणत्या बाजूने येणार ( हे अनुभवानी कळतं ) ते बघून कमीत कमी जागा व्यापावी. उतरणाऱ्यांना त्रास देऊ नये.

एखाद्या ग्रूप मध्ये शिरकाव करावा. ग्रूपबरोबर केला जाणारा प्रवास हा मुंबईच्या ट्रेन प्रवासातील सर्वात सुरक्षित प्रवास आहे.

ट्रेन पकडायच्या वेळेस आपल्या मनाचे ऐकावे. एक क्षण जरी वाटलं की फार गर्दी आहे, चढायला जमणार नाही तर सरळ ती ट्रेन सोडून द्यावी, चुकून सुद्धा गर्दीत चढायला जाऊ नये. आपण कुणी टाटा बिर्ला अंबानी नाही किंवा आपलं अंतराळयान सुटत नाहीये. विमानं सुद्धा आजकाल १५ २० मिनिटं थांबवतात.
गर्दीत चढल्यामुळे आपल्याला जितका त्रास होतो त्यापेक्षा जास्त त्रास अगोदर आत असलेल्यांना होतो, कारण आधीच असलेल्या गर्दीत पुन्हा तुम्हाला सामावून घ्यायचे असते. आपल्याला असलेला धोका वेगळाच.

मुंबईच्या प्रवासात डोकं शांत ठेवणं आणि विचारशक्ती, लॉजिक वापरणं हे मस्ट आहे. समोर असलेल्या ट्रेनमध्ये सहज चढायला जमत असेल तर आणि तरच चढावं. आपल्या जिवापेक्षा कोणतीही गोष्ट मोलाची नाही.

रेल्वे मंत्रालयानी असं करावं तसं करावं वगैरे शिकवायला जाऊन काही उपयोग नाही, आपण आपला कम्फर्ट बघावा, आणि ट्रेनला किती गर्दी असते, लोक कसे नालायक असतात, कुणाला सेन्सच कसा नसतो, त्यानी ढकललं तर मी का गप्प बसू वगैरे पोकळ समर्थन करून आपला त्रास कमी होत नाही, उलट वाढतो, तेव्हा जीवाला जपून प्रवास करावा.
.
.
.
.
.
.
.
.
.
अजूनही उपयुक्त टिप्स साठी संपर्क करा,

रेल-प्रवासी बोका,
ओंकार आठवले

No comments:

Post a Comment