Powered By Blogger

Monday, May 29, 2017

रेल्वे स्टेशनवरची सकाळ

सकाळी रेल्वे स्टेशनवर सोडायला येणाऱ्या मंडळींची मला जाम मजा वाटते. गेली साताठ वर्ष माझी सकाळची गाडी थोडेफार अपवाद वगळता फिक्स आहे. सकाळी ७:५१ च्या ट्रेन  साठी साधारण ७:४० ला मी स्टेशनला पोहोचतो. स्टेशनबाहेर रोज हीऽऽऽऽऽ झुंबड असते. एखादे जरासे वयस्कर वडील, बंडी आणि हाफ प्यांट घालून आलेले असतात, ते आपल्या आय टी वाल्या कन्यकेला स्कूटरवरून उतरायला सोपं जावं म्हणून स्कूटर अशी तिरकी करतात. ही कन्यका, त्यांच्या बंडीच्या वरच्या खिशात असलेली एक हिरवी नोट हळूच काढून घेऊन "बाय ड्याडी" करत ट्रेन साठी धावते. वडील हळुवार हसून मागे फिरतात. एक भावी अहो, आपल्या भावी सौ. चे विस्कटलेले केस सारखे करत असतात. एखादा प्रेमवीर आपल्या प्रेमके पखेरुला दिवसभराची ताटातूट सहन करण्याची ताकद देत असतो. एखादा सज्जन रिक्षावाला एखाद्या आजीबाईना रिक्षातून त्यांच्या पिशव्या उतरवायला मदत करत असतो. एखादी नवीन नवीन सौ. आपल्या अहोला "दुपारी नीट जेव, तुझ्या आवडीची भाजी आहे" वगैरे काहीबाही सांगत असते. काहीकाही नवऱ्यावर चिडलेल्या महिला गाडीवरून उतरून त्याला बाय न करता तशाच तरतर निघून जातात, बहुधा त्याच्या आळशीपणामुळे नेहमीची गाडी मिस झालेली असावी. एखादी सौ आपल्या अहो ला सोडायला आलेली असते, ती "वेळेवर घरी या हां" वगैरे सांगत असते… एखादी आज के जमाने की मम्मा आपल्या लाडल्याला सोडायला आलेली असते, ती प्रेमभरानी त्याला पापी वगैरे देते, याला प्रचंड अवघडल्यासारखं होतं. काही मातृ-पितृ भक्त मुलं गाडीवरून उतरताच आई अगर वडिलांच्या गुढघ्याला असा नमस्कार केल्यासारखा हात लावून पळतात. सकाळी सकाळी तृप्तता, प्रेम, आपुलकी, वात्सल्य, काळजी, वगैरे भावनांचं दर्शन रोज होतं. त्यातूनच त्या ट्रेन नामक महासागरातून तरून जाण्याची ताकद त्यांना मिळत असावी. मी आपला पेपर वाचता वाचता हे निरीक्षण करत असतो, आणि ट्रेन आली की त्या गर्दीचा एक भाग होऊन जातो…

निरीक्षक बोका,
ओंकार आठवले.

No comments:

Post a Comment